भारतामध्ये WhatsApp वरील वापरकर्त्यांची सुरक्षेची खात्री पटवणे

गैरवापर रोखण्यासाठी आणि ऑनलाइन सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेल्या मेसेजिंग सर्व्हिसेस देणाऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडर्समध्ये WhatsApp हे उद्योगातील अग्रणी मानले जाते. WhatsApp वर आमच्या वापरकर्त्यांची सुरक्षा हा आम्ही करत असलेल्या सर्व गोष्टींचा गाभा आहे.
सुरक्षा आणि गोपनीयता वाढवण्यात मदत करण्यासाठी WhatsApp ने प्रॉडक्टमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वापरकर्त्यांच्या सुरक्षेला सपोर्ट करण्यासाठी आम्ही प्रॉडक्टमधील अविरत नवीन सुधारणांव्यतिरिक्त अत्याधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा वैज्ञानिक, तज्ञ आणि प्रक्रियांमध्येदेखील सातत्याने गुंतवणूक केली आहे.

WhatsApp चे खाजगी स्वरूप

गोपनीयता आणि सुरक्षा आमच्या रक्तात भिनलेली आहे आणि त्यासाठीच २०१६ मध्ये आम्ही आमच्या ॲपमध्ये एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची सुरक्षा देऊ केली. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची सुरक्षा लाभलेले मेसेजेस, फोटो, व्हिडिओ, व्हॉइस मेसेजेस, डॉक्युमेंट्स, स्टेटस अपडेट्स आणि कॉल्स चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडण्यापासून सुरक्षित ठेवले जातात.
तुम्ही ज्या व्यक्तीशी संभाषण करत आहात ती व्यक्ती आणि खुद्द तुम्ही, हेच फक्त ते संभाषण वाचू अथवा ऐकू शकतात, अन्य कोणीही नाही, अगदी WhatsApp देखील नाही - याची खात्री करण्यात एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन मदत करते. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनमध्ये तुमचे मेसेजेस एका कुलुपाने सुरक्षित केले जातात आणि हे मेसेजेस उघडून वाचण्यासाठी लागणारी कुलुपाची चावी फक्त तुमच्याकडे आणि तुम्ही ज्या व्यक्तीला मेसेज पाठवला आहे त्या व्यक्तीकडे असते. तुमचे मेसेजेस सुरक्षित करण्यासाठी कोणतीही विशेष सेटिंग्ज सुरू करण्याची आवश्यकता नसून हे सर्व आपोआप घडते.

तुम्हाला सुरक्षित ठेवणारी प्रॉडक्ट फीचर्स

  • टू-स्टेप व्हेरिफिकेशन: आम्ही वापरकर्त्यांना टू-स्टेप व्हेरिफिकेशन हे फीचर सुरू करून त्यांच्या WhatsApp खात्यामध्ये सुरक्षेचा अतिरिक्त स्तर जोडण्याची शिफारस करतो. तुमचे सिम कार्ड चोरीला गेल्यास किंवा तुमचा फोन परक्या व्यक्तीच्या हातात पडल्यास, हे फीचर सुरू असल्यामुळे तुमचे WhatsApp खाते रीसेट करण्यासाठी आणि खात्याची पडताळणी करण्यासाठी सहा अंकी पिन आवश्यक असतो.
  • टच आयडी किंवा फेस आयडी वापरून तुमचे WhatsApp लॉक करणे: WhatsApp त्याच्या वापरकर्त्यांना iPhone साठी टच आयडी किंवा फेस आयडी आणि Android साठी फिंगरप्रिंट लॉक वापरून त्यांच्या खात्यामध्ये सुरक्षेचा आणखी एक स्तर जोडण्याची क्षमता प्रदान करते.
  • फॉरवर्ड करण्यावर मर्यादा सेट करणे: आम्ही मेसेजेस फॉरवर्ड करण्यावर मर्यादा सेट केल्या आहेत. मेसेजेस शेअर करण्यावर हेतूपूर्वक मर्यादा घातल्या आहेत अशा काही मोजक्या मेसेजिंग सर्व्हिसेसमध्ये आमचा समावेश आहे. ही लेबल्स वापरकर्त्यांना फॉरवर्ड केलेले मेसेजेस कोणते आहेत ते ओळखण्यात आणि तुम्ही ते किती वेळा फॉरवर्ड करू शकता हे जाणून घेण्यात मदत करतात. मेसेज आधीच फॉरवर्ड केलेला असल्यास, तुम्ही तो कमाल पाच लोकांना फॉरवर्ड करू शकता आणि मेसेजवर "अनेक वेळा फॉरवर्ड केलेला" असे लेबल असल्यास, तो एका वेळी फक्त एकाच व्यक्तीला फॉरवर्ड करता येतो. आम्ही नवीन ग्रुप फॉरवर्डिंग मर्यादादेखील सादर केल्या आहेत, ज्यामध्ये "फॉरवर्ड केलेला लेबल" असलेले मेसेजेस एका वेळी पाचऐवजी फक्त एकाच ग्रुपला फॉरवर्ड केले जाऊ शकतात.
  • तुमचा ऑनलाइन वावर नियंत्रित करणे: तुम्ही तुमचा ऑनलाइन वावर खाजगी ठेवू शकता. तुम्ही ऑनलाइन आहात हे कोण पाहू शकते आणि कोण पाहू शकत नाही हे तुम्ही निवडू शकता.
  • ब्लॉक करणे आणि तक्रार नोंदवणे: वापरकर्त्यांना आक्षेपार्ह मेसेजेस आढळल्यास, WhatsApp त्यांना खाती ब्लॉक करण्याचा आणि WhatsApp वर तक्रार नोंदवण्याचा एक सोपा मार्ग प्रदान करते. पारंपरिक एसएमएसमध्ये ही सुविधा नसते. असा आक्षेपार्ह आशय पाठवणाऱ्या संपर्कांची तक्रार करण्यासाठी आम्ही वापरकर्त्यांना प्रोत्साहन देतो. याचबरोबर, आता आम्ही वापरकर्त्यांना अजून एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या पर्यायामुळे वापरकर्त्यांना तक्रार नोंदणीचे मेसेजेस सत्यता पडताळणी अधिकारी किंवा कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांसोबत शेअर करायचे असतील, तर त्यांच्या फोनवर स्टोअर करता येतील. वापरकर्ते आता विशिष्ट मेसेज फ्लॅग करून WhatsApp वर खात्यांची तक्रार करू शकतात. तक्रार नोंदवण्यासाठी किंवा वापरकर्त्याला ब्लॉक करण्यासाठी वापरकर्त्यांनी फक्त मेसेज दीर्घकाळ दाबून ठेवणे आवश्यक आहे.
  • एक्स्पायर होणारे मेसेजेस: वापरकर्त्यांना WhatsApp वरून नाहीसे होणारे मेसेजेस पाठवता यावेत यासाठी आम्ही ‘एक्स्पायर होणारे मेसेजेस’ हे फीचर लाँच केले आहे. हे फीचर सुरू केल्यानंतर, वापरकर्त्यांनी निवडलेल्या कालावधीनुसार, वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमध्ये पाठवलेले नवीन मेसेजेस ते पाठवल्यानंतर चोवीस तास, सात दिवस किंवा नव्वद दिवसांनी नाहीसे होतील. आम्ही ‘एकदाच पहा’ हे फीचर लाँच केले आहे. या फीचरअंतर्गत चॅटमधील फोटो आणि व्हिडिओ ते उघडल्यानंतर चॅटमधून नाहीसे होतात. या फीचरमुळे वापरकर्त्यांना त्यांच्या गोपनीयतेवर अधिक नियंत्रण मिळते. सुरक्षेचा स्तर आणखी वाढवण्यासाठी आम्ही एकदाच पाहता येणाऱ्या मेसेजचा स्क्रीनशॉट ब्लॉक करणेदेखील सुरू केले आहे.
  • ग्रुप गोपनीयता सेटिंग: WhatsApp ची गोपनीयता सेटिंग्ज आणि ग्रुप आमंत्रण सिस्टीम यांमुळे आपल्याला ग्रुप्समध्ये कोण सामील करून घेऊ शकेल हे वापरकर्त्यांना ठरवण्याची अनुमती मिळते. या महत्त्वपूर्ण बदलामुळे वापरकर्त्याच्या गोपनीयतेत वाढ होईल आणि नको असलेल्या ग्रुप्समध्ये जोडले जाणे टाळण्यात मदत होईल.
  • सूचना न देता ग्रुप सोडा: वापरकर्ते सर्वांना सूचित न करता खाजगीरीत्या ग्रुपमधून बाहेर पडू शकतात. तुम्ही ग्रुप सोडताना संपूर्ण ग्रुपला सूचित करण्याऐवजी फक्त ॲडमिन्सना सूचित केले जाईल
  • ॲडमिन नियंत्रणे: वापरकर्त्यांना अतिरिक्त नियंत्रण क्षमता देण्यासाठी आम्ही WhatsApp ग्रुप्समध्ये अनेक बदल केले आहेत. ग्रुप्समध्ये कोण कोण मेसेज पाठवू शकेल हे ॲडमिनला ठरवू देणारे एक नवीन सेटिंग आम्ही लाँच केले आहे.
  • एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेला बॅकअप: वापरकर्ते आता iCloud किंवा Google Drive वर त्यांच्या चॅट बॅकअप्सचे संरक्षण करण्यासाठी त्या बॅकअप्सना एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित करू शकतात. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेल्या बॅकअपसह मेसेजेस आणि मीडिया फाइल्स हे सर्वकाही क्लाउडवर स्टोअर केले जाते व पासवर्ड किंवा ६४ अंकी एन्क्रिप्शन की वापरून सुरक्षित केले जाते.

भारतामध्ये गैरवापर रोखणे

आमच्या मेसेजिंग सर्व्हिसवर पाठवलेल्या वैयक्तिक मेसेजेसचा आशय WhatsApp थेट पाहू शकत नाही. म्हणूनच, आम्ही खात्यांच्या वर्तणूक संकेतांवर आणि वापरकर्त्यांच्या तक्रारी, प्रोफाइल फोटो, ग्रुप फोटो व वर्णने अशा उपलब्ध व एन्क्रिप्ट न केलेल्या माहितीवर अवलंबून असतो. आम्ही आमच्या वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी सुरक्षा उपाय आणि सुरक्षा प्रक्रियांचा वापर करतो. आम्ही स्पॅमला थांबवण्यासाठी गैरवापर करणारी खाती शोधण्याकरिता आणि त्यांवर कारवाई करण्याकरिता स्पॅमचा शोध घेणारे तंत्रज्ञान लागू करतो. याव्यतिरिक्त, आम्ही भारतासाठी काही विशिष्ट प्रक्रिया तयार केल्या आहेत, ज्या भारतामध्ये WhatsApp वरील गैरवापर टाळण्यात मदत करतात.
  • तक्रार निवारण अधिकारी: आमच्याकडे भारतामध्ये तक्रार निवारण अधिकारी आहे, ज्याच्याशी वापरकर्त्याला त्याच्या अनुभवाबद्दल काही समस्या असेल आणि तो इतर कोणत्याही मार्गाने तक्रार दाखल करू शकत नसेल, तर संपर्क साधता येईल. आम्ही आमच्या वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सरकार व कायदा अंमलबजावणी अधिकार्‍यांकडून आलेल्या विनंत्यांसाठी येथे स्वतंत्र समर्पित चॅनल प्रदान करून त्यांना त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी सरकारी अधिकार्‍यांसोबत सातत्याने काम करतो.
  • मासिक रिपोर्ट: IT नियम २०२१ चे पालन करून WhatsApp भारतात नियमितपणे मासिक रिपोर्ट जारी करते, ज्यामध्ये WhatsApp वर वापरकर्त्यांच्या सुरक्षेची खात्री पटवण्यासाठी आम्ही उचललेल्या पावलांबद्दलची माहिती ठळकपणे दिलेली असते. रिपोर्टमध्ये वापरकर्त्याच्या तक्रारी आणि त्या तक्रारींच्या निराकरणासाठी WhatsApp ने अंमलात आणलेल्या संबंधित कृती तसेच प्लॅटफॉर्मवरील गैरवापराला आळा घालण्यासाठी WhatsApp ने राबवलेल्या प्रतिबंधात्मक कृतींचा तपशील दिलेला असतो. तुम्ही भारताचा मासिक अहवाल येथे पाहू शकता.
चाइल्ड सेक्शुअल अब्युझ मटेरिअल (CSAM) आणि लैंगिक शोषणाशी संबंधित इतर आशयाविषयी WhatsApp ने शून्य सहिष्णुता धोरण अंगिकारले आहे. WhatsApp या प्रकारचे गैरवर्तन शोधून त्यास प्रतिबंध करते. यासाठी वापरकर्त्यांकडून आलेल्या तक्रारींसारख्या एन्क्रिप्ट न केलेल्या उपलब्ध माहितीचा उपयोग करून घेतला जातो. तसेच अशा प्रकारच्या गैरवर्तनाचा शोध घेणाऱ्या तंत्रज्ञानामध्येही आम्ही सातत्याने सुधारणा करत आहोत. आम्ही उल्लंघन करणारा आशय आणि खात्यांची तक्रार नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन (NCMEC) यांच्याकडे नोंदवतो. ते या सायबर टिप्सचा वापर जागतिक स्तरावरील व भारतातील कायद्याच्या अंमलबजावणीसाठी, विशेषत: नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (“NCRB”) यांना संदर्भ म्हणून देण्यासाठी करतात.

कायदा अंमलबजावणी विभागासोबत काम करणे

WhatsApp कायदा अंमलबजावणी करणार्‍या संस्थांसोबत जवळून काम करते आणि लागू कायदे व आमच्या धोरणांच्या आधारावर कायदा अंमलबजावणी विनंत्यांचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करते. भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने आम्ही समुदायामध्ये WhatsApp चा एक संसाधन म्हणून वापर कसा करावा, WhatsApp वर नागरिकांना प्रतिसाद कसा द्यावा आणि गुन्हे तपासाच्या प्रक्रियेत WhatsApp ला कायदेशीर विनंत्या कशा कराव्यात याबद्दल कायदा अंमलबजावणीशी संबंधित प्रशिक्षण देऊ केले आहे. या प्रक्रियेसंबंधित अधिक माहिती येथे मिळू शकते.

चुकीच्या माहितीचा प्रसार रोखणे

चुकीची माहिती पसरवणे ही वर्तणुकीशी आणि समाजाशी संबंधित आपत्ती आहे हे आम्ही जाणतो. म्हणूनच, वापरकर्त्यांना माहितीची पडताळणी करण्यात मदत करणाऱ्या स्रोतांची मदत मिळावी यासाठी आम्ही प्रॉडक्टमधून नवनवीन प्रयोग व शिक्षण या दोन्हीसाठी प्रयत्न करत आहोत.
  • WhatsApp मध्ये सत्यता पडताळणे: भारतातील १० सत्यता पडताळणी संस्था (एप्रिल २०२३ पर्यंत) वापरकर्त्यांना WhatsApp बॉटद्वारे माहितीची पडताळणी करण्याची सर्व्हिस प्रदान करण्यात मदत करतात. या संस्थांना WhatsApp API प्लॅटफॉर्म सोल्युशनचा सपोर्ट आहे आणि त्या इंटरनॅशनल फॅक्ट-चेकिंग नेटवर्क द्वारे मान्यताप्राप्त आहेत. IFCN चा बॉट ही सर्व्हिस विनामूल्य आहे. मेसेज किंवा माहितीची पडताळणी करून घेण्यासाठी वापरकर्ते +1 (727) 2912606 हा नंबर संपर्क म्हणून सेव्ह करून त्यावर ”Hi” असा मेसेज पाठवू शकतात. तसेच, सत्यता पडताळणाऱ्या संस्थांची जागतिक डिरेक्टरी ॲक्सेस करण्यासाठी आमचे वापरकर्ते http://poy.nu/ifcnbot वर क्लिक करू शकतात.
  • सार्वजनिक शैक्षणिक मोहिमा: आम्ही वापरकर्त्यांना त्यांना प्राप्त झालेल्या मेसेजेसबद्दल विचार करण्यास आणि त्यांच्या सत्यतेची अधिकृत विश्वसनीय स्रोतांद्वारे पडताळणी करण्यास प्रोत्साहन देतो. WhatsApp ने आमच्या 'आनंद पसरवा, अफवा नाही' या मोहिमेसह अनेक देशांमध्ये चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यात मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक मोहिमा सुरू केल्या आहेत. एखादा मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याच्या सत्यतेची नेहमी पुन्हा एकदा तपासणी करण्याची वापरकर्त्यांना आठवण करून देण्यासाठी, आम्ही 'शेअर करण्यापूर्वी तपासा' या नावाची आमची दुसरी मोहीम लाँच करून या बहुवर्षीय मोहिमेतील पुढील पाऊल उचलले आहे.
  • सुरक्षित निवडणुकांना सपोर्ट करणे: उद्योग उपक्रमाचा भाग म्हणून, WhatsApp ने भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) संयुक्त विद्यमाने एक उच्च प्राधान्य चॅनल सेट केले. मुक्त आणि पारदर्शक निवडणुका आयोजित करण्यात भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) मदत करताना WhatsApp स्वघोषित आचारसंहितांचे पालन करते. भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) अधिकाऱ्यांना भारतीय निवडणुका कशा आयोजित कराव्यात याबद्दल अपडेट केलेली माहिती देण्यासाठी आणि एकत्रितपणे अधिक प्रभावीपणे काम कसे करता येईल यावर चर्चा करण्यासाठी WhatsApp नियमितपणे त्यांच्या संपर्कात असते.
    याव्यतिरिक्त, WhatsApp चा जबाबदारीने वापर करण्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी राजकीय पक्षांना सर्व निवडणुकांपूर्वी प्रशिक्षण दिले जाते. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वापरकर्त्यांच्या पूर्व संमतीशिवाय त्यांना WhatsApp मेसेजेस पाठवल्यास कार्यकर्त्यांची खाती बॅन केली जाऊ शकतात याबाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांना सावधगिरीची सूचना देण्याचे काम हे प्रशिक्षण करते.

सायबर सुरक्षेसंबंधित सर्वोत्तम पद्धतींचा प्रचार करणे

  • व्हेरिफिकेशन कोड शेअर करणे: वापरकर्त्याच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी, WhatsApp अज्ञात तृतीय पक्षांसोबत व्हेरिफिकेशन कोड शेअर न करण्याची शिफारस करते. उदाहरणार्थ, एखाद्या वापरकर्त्याला रिवॉर्ड किंवा विशेष ऑफरच्या बदल्यात त्यांच्या व्हेरिफिकेशन कोडची विनंती करणारा मेसेज मिळाल्यास (एसएमएस किंवा इतर मार्गांनी), पाठवणारी व्यक्ती ही एक वाईट प्रवृत्तीची व्यक्ती असू शकते, ती तोतयेगिरी अथवा इतर घोटाळ्यांद्वारे त्या वापरकर्त्याचे खाते ॲक्सेस करण्याचा आणि नंतर त्या खात्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करत असेल हे वापरकर्त्यांनी लक्षात ठेवावे अशी शिफारस केली जाते.
  • तोतयेगिरी: वापरकर्त्याच्या खात्याचा ॲक्सेस मिळवणारी वाईट प्रवृत्तीची व्यक्ती पीडित व्यक्तीच्या प्रोफाइल फोटोचा गैरवापर करणे किंवा पीडित व्यक्ती असल्याचे भासवून त्या व्यक्तीच्या संपर्कांना पैशाची विनंती करणारा मेसेज पाठवणे अशा कृतींनी खात्याला धोका निर्माण करू शकते. यासोबतच, वाईट प्रवृत्तीची व्यक्ती वापरकर्त्याच्या संपर्कांची तोतयेगिरी करण्यासाठी, माहिती किंवा इतर मदतीकरिता विनंत्या करून पीडित व्यक्तीला मेसेज पाठवण्यासाठी वापरकर्त्याचे संपर्क ॲक्सेस करू शकते.
    संवेदनशील माहिती, पैसे किंवा इतर मदतीची विनंती करणारे मेसेजेस माहितीतल्या संपर्कांकडून आलेले दिसत असले, तरीही तुम्ही अशा मेसेजेसची काळजीपूर्वक तपासणी करावी अशी आम्ही आग्रहाने शिफारस करतो. अशा परिस्थितीत, मेसेज खरोखरच माहितीतल्या एखाद्या व्यक्तीकडून पाठवला गेला होता का, याची पडताळणी करणे उत्तम. (उदाहरणार्थ, संपर्काला कॉल करणे आणि त्यांनी विनंती पाठवली आहे का हे विचारणे). टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुरू केल्याने तुमच्या खात्याचे फिशिंग हल्ल्यांपासून आणि खाते ताब्यात घेण्यासाठी स्कॅमर्स करत असलेल्या प्रयत्नांपासून संरक्षण होईल.
  • इतर घोटाळे: वापरकर्त्यांना कोणत्याही ॲपवर अचानक मोठा लाभ होणे, नोकरीची ऑफर मिळणे, त्वरित पैसे कमावण्याची योजना सांगीतली जाणे यांसारखे इतर मेसेजेस मिळू शकतात. तुम्ही योग्य तो निर्णय घ्या. 'अचानक फार मोठा आर्थिक लाभ' देणाऱ्या मेसेजेसची काळजीपूर्वक तपासणी करा, कारण ते घोटाळे असू शकतात. अशा वापरकर्त्यांशी पुढे संवाद न साधता त्यांना ब्लॉक करा आणि तक्रार नोंदवा.

स्पष्टीकरणे आणि उपयुक्त माहिती

  • चॅटचे स्टोरेज:
    • WhatsApp द्वारे वापरलेले एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन तंत्रज्ञान WhatsApp मधील सर्व वैयक्तिक मेसेजेससाठी पाठवणाऱ्यामधील व प्राप्तकर्त्यामधील संभाषणे, WhatsApp आणि तृतीय पक्षांना वाचता येऊ नये म्हणून संरक्षित करते आणि त्यांना खाजगी ठेवण्यात मदत करते.
    • आमच्या सर्व्हिसेस नेहमीप्रमाणे पुरवण्याचा भाग म्हणून एकदा मेसेजेस डिलिव्हर झाले की ते मेसेजेस किंवा अशा डिलिव्हर झालेल्या मेसेजेसचे ट्रान्झॅक्शन लॉग्स WhatsApp स्टोअर करत नाही. डिलिव्हर न झालेले मेसेजेस 30 दिवसांनी आमच्या सर्व्हर्समधून हटवले जातात.
    • तथापि, एखादा मेसेज वापरकर्त्यांपर्यंत पोहोचतो, तेव्हा वापरकर्त्याच्या डिव्हाइसमध्ये वापरकर्त्याचा डेटा आपोआप स्टोअर करणारे डीफॉल्ट स्टोरेज पर्याय असू शकतात.
    • नको असलेल्या लोकांना (वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींसह) वापरकर्त्यांच्या डिव्हाइसवर स्टोअर केलेला आशय ॲक्सेस करण्यापासून रोखण्यासाठी, आम्ही वापरकर्त्यांना क्लिष्ट पासवर्ड किंवा इतर सुरक्षा फीचर्स यांसारख्या त्यांच्या डिव्हाइसच्या ऑपरेटिंग सिस्टीमद्वारे (OS) प्रदान केलेल्या सुरक्षा फीचर्सचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करतो.
    • वापरकर्त्यांनी तृतीय-पक्ष डेटा बॅकअप सर्व्हिसेसचे (जसे की iCloud किंवा Google Drive) सदस्यत्व घेतलेले असू शकते. या सर्व्हिसेस वापरकर्त्याचे एसएमएस, ईमेल किंवा मेसेजेस इत्यादी माहिती स्टोअर करतात. जेव्हा अशा सर्व्हिसेसची मदत घेतली जाते, तेव्हा वापरकर्त्याला प्रदान केलेल्या सर्व्हिसेस, ॲप्स आणि प्रॉडक्ट्सच्या वापरावर तृतीय पक्षाच्या सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरणांचे नियंत्रण असते.
    • याव्यतिरिक्त, वापरकर्ते बाह्य पक्षांना त्यांच्या डिव्हाइसचा प्रत्यक्ष ॲक्सेस देऊ करतात अशीही परिस्थिती उद्भवू शकते. यामुळे इतर लोकांमुळे वापरकर्त्याचा डेटा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होते, उदाहरणार्थ चॅट्सचे स्क्रीनशॉट पाहणे किंवा ते कॅप्चर करणे, कॉल ऐकणे किंवा ते रेकॉर्ड करणे.
  • ट्रेस करण्याची क्षमता:
    • काही लोक चुकीने असे गृहीत धरतात, की एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची सुरक्षा असूनही मेसेज पाठवणारी मूळ व्यक्ती WhatsApp ला ओळखता येते. हे शक्य नसते.
    • मेसेजिंग ॲपसाठी चॅट्स “ट्रेस” करण्याची आवश्यकता असणे हे आम्हाला WhatsApp वर पाठवलेल्या प्रत्येक मेसेजचे फिंगरप्रिंट ठेवण्यास सांगण्यासारखे वाटते. यामुळे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची सुरक्षा खंडित होईल आणि WhatsApp वरील आमच्या वापरकर्त्यांच्या वैयक्तिक संभाषणांची गोपनीयता ढासळेल. ट्रेसेबिलिटीमुळे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची सुरक्षा कशी खंडित होते याबद्दल अधिक माहिती तुम्ही येथे पाहू शकता.
    • WhatsApp मेसेजवर फॉरवर्ड करण्याच्या मर्यादा घालू शकते, तर त्यांना तो मेसेज सुरुवातीला कोणी लिहिला या माहितीशिवाय त्या मेसेजमधील आशयदेखील माहिती असतो असा काहीजणांचा गैरसमज असतो. हा समज खरा नाही. फॉरवर्ड केलेल्या मेसेजेसची मोजणी WhatsApp च्या सर्व्हरवर न होता वापरकर्त्यांच्या डिव्हाइसवर होते आणि ती एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने संरक्षित केली जाते, म्हणजेच त्याचा ॲक्सेस फक्त मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीच्या डिव्हाइसला व प्राप्तकर्त्याच्या डिव्हाइसला असतो.

तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?

होय
नाही