WhatsApp बाल शोषणाविरूद्ध लढण्यात कसे मदत करते

WhatsApp वर बाल लैंगिक शोषण आणि गैरवर्तन यांबद्दल शून्य सहिष्णुता धोरण आहे. वापरकर्ते बालशोषणविषयक किंवा लहान मुलांना धोक्यात आणणारा आशय शेअर करत आहेत असे आमच्या लक्षात येते, तेव्हा आम्ही त्यांना बॅन करतो. आम्ही धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या अशा आशयाची आणि खात्यांची तक्रार नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉयटेड चिल्ड्रन (NCMEC) कडेही करतो. ही संस्था अशा CyberTips जगभरातील कायदेसंस्थाना पाठवते. आमच्याकडे अशा प्रकारचे शोषण आणि गैरवर्तन टाळण्यात मदत करणारी फीचर्स आणि नियंत्रणे आहेत. अशा प्रकारची कृत्ये करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक समर्पित टीम कार्यरत आहे आणि या टीममध्ये कायदे अंमलबजावणी, ऑनलाइन सुरक्षा धोरण, तपास आणि तंत्रज्ञान विकास या क्षेत्रांमधील तज्ञांचा समावेश आहे.
गैरवर्तनास आळा घालणे
WhatsApp वैयक्तिक मेसेजिंगसाठी तयार करण्यात आले आहे. आमच्या वापरकर्त्यांच्या गोपनीयता आणि सुरक्षिततेचे संरक्षण करण्यासाठी, WhatsApp बाय डीफॉल्ट एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची सुरक्षा देते. याचाच अर्थ, फक्त मेसेज पाठवणारी आणि मिळवणारी व्यक्तीच मेसेजमधील आशय पाहू शकते. आमच्या वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी, आम्ही सर्वप्रथम गैरवर्तनास प्रतिबंध करण्यासाठी काम करतो. इतर सार्वजनिक प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही अनोळखी व्यक्तींचाही शोध घेऊ शकता, तसे WhatsApp वर करता येत नाही. एखाद्या व्यक्तीशी कनेक्ट होण्यासाठी तुमच्याकडे त्या व्यक्तीचा नंबर असणे आवश्यक आहे. तुमच्या ॲड्रेस बुकमध्ये नसलेली व्यक्ती तुम्हाला पहिल्यांदाच मेसेज करते, तेव्हा आम्ही 'ब्लॉक करा' किंवा 'तक्रार नोंदवा' असे पर्यायही देतो. WhatsApp वर पाठवलेले ९०% मेसेजेस दोन लोकांमध्ये झालेल्या संभाषणाच्या स्वरूपातले असतात आणि साधारणतः ग्रुपमध्येसुद्धा सरासरी १० पेक्षा कमीच लोक असतात. आम्ही वापरकर्त्यांना त्यांना ग्रुपमध्ये कोण जोडू शकेल हे नियंत्रित करण्याचा पर्याय देतो आणि व्हायरल हानीकारक आशयाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी एका वेळी एखादा मेसेज किती चॅट्सना फॉरवर्ड करता येईल यावर मर्यादा घालतो.
चाइल्ड एक्सप्लॉयटेशन इमेजरी (CEI) चा समावेश असलेल्या किंवा ग्रुप आमंत्रण लिंक्सद्वारे अशा प्रकारचा आशय शेअर करण्यात स्वारस्य असलेल्या लोकांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ॲप्सचा प्रसार रोखण्यासाठी आम्ही ॲप स्टोअर पुरवठादारांसहदेखील मिळून काम करतो. आम्ही लोकप्रिय सर्च इंजिन्समधील आमंत्रण लिंक्सच्या लिस्टिंगवरही निर्बंध घालतो.
शोध घेणे
लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचा सामना करण्यासाठी, WhatsApp या प्रकारचे गैरवर्तन शोधून त्यास प्रतिबंध करते. यासाठी वापरकर्त्यांकडून आलेली तक्रारींसारख्या एन्क्रिप्ट न केलेल्या उपलब्ध माहितीचा उपयोग करून घेतला जातो. तसेच अशा प्रकारच्या गैरवर्तनाचा शोध घेणाऱ्या तंत्रज्ञानामध्येही आम्ही सातत्याने सुधारणा करत आहोत.
गैरवर्तनाचा शोध घेण्याच्या पद्धतींमध्ये फोटो-मॅचिंग, व्हिडिओ-मॅचिंग तंत्रज्ञानासारखे अत्याधुनिक ऑटोमेटेड तंत्रज्ञान वापरले जाते. यामुळे CEI असलेले प्रोफाइल, ग्रुप फोटो किंवा CEI चा समावेश असलेल्या वापरकर्ता तक्रारी अशी एन्क्रिप्ट न केलेली उपलब्ध माहिती प्रोॲक्टिव्ह पद्धतीने स्कॅन केली जाते. या एन्क्रिप्ट न केलेल्या उपलब्ध माहितीतील अज्ञात CEI चा शोध घेण्यासाठी आमच्याकडे अतिरिक्त तंत्रज्ञान आहे. आम्ही वापरकर्ता प्रोफाइल आणि ग्रुपची माहिती यांसारखे मजकूर स्कॅन करण्यासाठी व CEI चे शेअरिंग होते असा संशय असलेल्या अशी वापरकर्ता प्रोफाइल्स आणि ग्रुप्सची माहिती व वर्तन यांचे मूल्यांकन करण्यासाठी मशीन लर्निंग क्लासिफायर्सचाही वापर करतो.
WhatsApp सक्रिय राहून अशा गैरवर्तनाचा शोध घेण्यात पुढाकार घेतेच, शिवाय वापरकर्त्यांनाही अशा समस्याजनक आशयाची तक्रार नोंदवण्यास प्रोत्साहित करते. वापरकर्त्यांना कधीही कोणत्याही खात्याला किंवा ग्रुप्सना ब्लॉक करता येते अथवा त्यांची तक्रार नोंदवता येते. WhatsApp वर सुरक्षित कसे राहावे हे जाणून घेण्यासाठी आमच्या मदत केंद्रास भेट द्या.
या तंत्रांचा वापर करून WhatsApp दर महिन्याला CEI शेअरिंग होते असा संशय असलेल्या ३,००,००० हून अधिक खात्यांना बॅन करते.
कायदा अंमलबजावणी विभागासोबत काम करणे
जगभरातील लोक सुरक्षित राहावेत यासाठी कायदा अंमलबजावणी संस्था जे काम करते त्याची WhatsApp ला जाण आहे. कायदा अंमलबजावणी संस्थांना आमच्याशी संपर्क कसा साधावा आणि WhatsApp शी निगडित विनंत्या कशा कराव्यात हे समजावे यासाठी आम्ही या संस्थांसोबत नियमितपणे संपर्कात असतो. Information for Law Enforcement Authorities या आमच्या संसाधन केंद्रामध्ये कायदा अंमलबजावणी संस्थांना अशा प्रकारच्या कायदेशीर विनंत्या सुरक्षितपणे सबमिट करण्यासाठी ऑनलाइन सिस्टमचा समावेश करण्यात आला आहे.
WhatsApp ला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर CEI आहेत याची जाणीव होते, तेव्हा आम्ही संबंधित खात्यांना बॅन करतो. यू.एस. कायद्याचे पालन करून आम्ही इमेजेस काढून टाकतो आणि संबंधित खात्याच्या तपशीलांसह आम्ही त्या खात्याची NCMEC कडे तक्रार करतो.
NCMEC ही तक्रार अधिक तपासणीसाठी कायदा अंमलबजावणी विभागाला सूपूर्द करते तेव्हा, कायदा अंमलबजावणी विभागाच्या विनंत्यांना प्रतिसाद देण्यासाठी WhatsApp सज्ज असते. WhatsApp ला कायदा अंमलबजावणी विभागाकडून फीडबॅक मिळाला आहे की, आमच्या प्रयत्नांमुळे बाल शोषणाला बळी पडलेल्यांची सुटका होण्यात मदत झाली.
फेब्रुवारी, २०२१ (बॅन केलेल्या खात्यांची Q4 २०२० विश्लेषणावर आधारित आकडेवारी)
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही